मकरंद अनासपुरेंचा ‘छापा काटा’ १५ डिसेंबरला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित!

by Priya Jadhav

मुंबई: अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाचा पहिल्यांदा दणक्यात पोस्टर लॉंच झाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता एकदम शिगेला पोहचून कमालीचा उत्साह पहायला मिळाला होता. चित्रपटाच्या विलक्षण पोस्टरनंतर प्रत्येकाचं चित्त वेधून घेणारा ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला आणि ट्रेलरने संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार धमाका उडवला.

चित्रपटात प्रेम, भावना, उत्साह आणि मनमुराद गीतांचा जबरदस्त संगम जुळून आला आहे. अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर यांच्या आवाजातलं ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ गाणं रसिकांना प्रेमाच्या मोहक गंधात धुंद करत आहे. गाण्याचे बोल मेघना गोरे यांनी लिहिले असून सुप्रसिद्ध संगीतकार मुकेश काशीकर यांनी बेधुंद संगीत दिले आहे. सुनिधि चौहान यांच्या आवाजतलं ‘मन हे गुंतले’ हृदय पिळवटून टाकणारं गाणं शिवम बारपांडे यांनी शब्दबद्ध केले असून मराठी हिंदी सिनेसृष्टीतले सुप्रसिद्ध संगीतकार गौरव चाटी यांनी संगीत दिले आहे. 

दोन्ही गाण्यांना आतापर्यंत दहा लाखांहून अधिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि आणखी मिळत आहे. त्याचबरोबर शिवम बारपांडे आणि गौरव चाटी यांचंच आदर्श शिंदेच्या आवाजतलं ‘छापा काटा’ शीर्षकगीत तसेच शशांक कोंडविलकरांनी शब्दबद्ध, गणेश सुर्वेंनी संगीत आणि गौरव चाटी यांनी स्वर दिलेलं ‘आई तुझ्या नावानं गोंधळ मांडला’ गोंधळगीताने महाराष्ट्रभर जोरदार धुमाकूळ घातला आहे.

लोकांना वेड्यात काढून पॉलिसी विकणारा करामती नाम्या बहिणीच्या लग्नासाठी श्रीमंत शनयाशी लग्नाचा करार करतो खरा, पण हा नकली लग्नाचा करार नाम्या आणि शनायाच्या कुटुंबात काय धमाल विनोदी गोंधळ घालणार आणि त्या कराराचं पुढे काय होणार हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. नाम्या म्हणजेच मकरंद अनासपूरे आणि श्रीमंत मुलगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या विनोदाचा डबल धमाल चित्रपटात पहायला मिळणार आहे.  

धमाल विनोदी चित्रपट ‘छापा काटा’ १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे. छायाचित्रण गौरव पोंक्षे, बिजनेस हेड (अल्ट्रा डिजिटल स्टुडिओ) अरविंद अग्रवाल, संकलक मीनल राकेश म्हादनाक, कार्यकारी निर्माता दर्शन चोथाणी, बिजनेस हेड (अल्ट्रा मराठी) श्याम मळेकर, क्रिएटिव्ह निर्माता रजत अग्रवाल आणि सोशल मिडिया अँड डिजिटल मार्केटिंग ब्रिन्दा अग्रवाल आहेत.

“महाराष्ट्रातील मराठी मनामनामध्ये मनोरंजनाचा महोत्सव कायम साजरा करण्यासाठी आम्ही नाविन्यपूर्ण मनोरंजन निर्मितीसाठी सातत्याने तत्पर असतो. यावेळी ‘छापा काटा’ चित्रपटात नव्या युगाला भावेल आणि त्यांचं भरभरून मनोरंजन होईल अशाच पद्धतीचा ऐवज आम्ही रसिक प्रेक्षकांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सादर करत आहोत.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले. 

Comments

Popular posts from this blog

KERALA TOURISM WOOS TOURISTS

Excellent Classes organises 34th edition of HUES, felicitates its meritorious students

Haier Launches Inverter Expert Air Conditioner Series - A New Dawn in Air Conditioning